Work From Home करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुंदर पिचाईंचा ई-मेल


संपूर्ण जगाचे आर्थिक गणित कोरोना महामारीमुळे बिघडले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. कोरोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. गुगलने अशातच वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे.

गुगलने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा दिली आहे. कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे. आम्ही कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरे वाटले, असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

मला आशा आहे की, या संकटकाळात प्रत्येक जण काळजी घेत आहे. कोरोना महामारी आल्यापासून आपण कर्मचाऱ्यांचे हित समोर ठेवले आहे. कठीण काळात २०० नवे प्रोडक्ट लाँच करताना आपण ग्राहक आणि भागिदारांची काळजी घेण्यासही पुढाकार घेतला आहे. कोरोनाची साथ पाहता मार्च २०२० मध्ये आपण कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. तसेच कोरोनाचा धोका पाहता आपण हा अवधी वाढवला देखील आहे. कार्यालये बंद असताना देखील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी.

या व्यतिरिक्त आपण जगभरातील कमी उत्पन्न असलेल्या देशातील १ मिलियन लोकांचे लसीकरण गुगलर्सच्या उदारतेमुळे आणि गुगल डॉट ओरजीकडून मिळालेल्या समर्थनामुळे पूर्ण केले आहे. असे असले तरी कोरोनाचा फैलाव जगातील अनेक भागात होत आहे. ज्या भागात कोरोनाच्या लसी उपलब्ध आहेत आणि लसीकरण वेगाने होत आहे. अशा ठिकाणांची कार्यालये उघडणे सोयीस्कर वाटत असल्यामुळे गुगलर्सना पुन्हा एकदा कॅफेमध्ये जेवणाचा आनंद आणि विचारमंथन करताना पाहून आनंद वाटत आहे. लसीकरणामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचा संदेश गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मेलद्वारे दिला आहे.