उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना स्वतंत्र लढवेल. जेवढी आमची ताकद आहे, त्या ताकदीने लढू, असे संजय राऊतांनी दिल्लीत एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

संजय राऊत बॅंकाच्या निर्णयाबाबत बोलताना म्हणाले की, बॅंका बुडवणारे कोण आहेत ते पाहा. बॅंका बुडवण्यामागे कोणाची प्रेरणा आहे, ते पहावे लागेल. बॅंका का बुडत आहेत यासंदर्भात तपास करावा लागेल. आम्ही मुंबईत अनुभव घेतला आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागतच आहे. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहील, या संदर्भात पावले टाकणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवारांशी ममता बॅनर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की, आधी एकत्र यावे. नेता कोण असावे हे नंतर ठरवता येईल. तृणमूल पक्षाची बैठक असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. विकास कामासंदर्भात ममता बॅनर्जी या गडकरींना भेटत असतील, असेही ते म्हणाले.

संजय राऊत संसदेच्या कामकाजाविषयी बोलताना म्हणाले की, मोदी-शाह चर्चेला 3 तास का देऊ शकत नाहीत. या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही. सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकारला गोंधळ निर्माण करायचा आहे. पेगॅसिसवर सत्य ऐकण्याची भिती त्यांना वाटत आहे. विरोधी पक्ष जनतेचा आवाज असतो. केंद्र सरकार गोंधळास प्रवृत्त करत आहे. गोंधळात विधेयक संमत करायची हेच सरकारला हवे आहे. सरकारला लोकशाहीवर संसदीय प्रणालीवर विश्वास नाही. पेगॅसिस चर्चावर मोदींनी, अमित शाहांनी संसदेत उपस्थित रहावे, असेही राऊत म्हणाले. कृषी कायद्याच्या विषयावर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले.