काल दिवसभरात देशात 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात काहीसा कमी झाला असला, तरी धोका अद्याप टळलेला नाही. देशात सलग दुसऱ्या दिवशी 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 43,509 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 640 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 22,056 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल दिवसभरात 38,465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 15 लाख 28 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 22 हजार 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 7 लाख 1 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 3 हजार 840 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 28 जुलैपर्यंत देशभरात 45 कोटी 7 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 43 लाख 92 हजार लसीचे डोस देण्यात आले होते. आयसीएमआरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 46 कोटी 26 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. काल दिवसभरात 17.28 लाख कोरोनाचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 6,857 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 64 हजार 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53टक्के आहे.

राज्यात आज 286 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 93 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (44), हिंगोली (33), यवतमाळ (6), गोंदिया (50), चंद्रपूर (33), गडचिरोली (801) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भंडाऱ्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 677 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 73,69, 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,82, 914 (13.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,88,537 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,364व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 404 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 382 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,697 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,280 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1383 दिवसांवर गेला आहे.