भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील पदविका अभ्यासक्रमासासाठी अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रमधील विद्यार्थ्यांसाठी बरगढ (ओडिशा) मध्ये 13 व वेंकटगिरी करीता 2 जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर / सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात 20 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले अर्ज संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांच्याकडे सादर करावा. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://dirtexmah.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.