शेकडो भुयारे असलेला, रहस्यमयी शेरगढ किल्ला

भारत हा प्राचीन काळापासून राजेरजवाडे यांची भूमी राहिलेला देश आहे. सुरक्षा, शान शौकत यासाठी या सम्राटांनी, शासकांनी अनेक किल्ले बांधले होते. त्यातील काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात असलेला शेरगढ हा असाच एक किल्ला. अफगाणी शासक शेरशहा सुरी याने पहाड कापून त्याच्या आत हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तहखाने असून त्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या किल्ल्याबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. शत्रू पासून बचाव व्हावा यासाठी शेरशहा, त्याचा परिवार आणि १० हजार सैनिकांसह येथे राहत असे. सुरक्षेबरोबरच सर्व सुविधांनी हा किल्ला परिपूर्ण होता.

या किल्ल्याचे बांधकाम असे केले गेले होते की, कुठल्याही दिशेने शत्रू येत असेल तर १० किमी अंतरावरून सुद्धा शत्रू दिसत असे पण शत्रूला जवळ येईपर्यंत किल्ला दिसत नसे. या किल्ल्याच्या तीन बाजूला जंगल आणि एका बाजूला दुर्गावती नदी आहे. १५४० ते १५४५ या काळात शेरशहा येथे राहत होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे असून त्याची माहिती फक्त शेरशहा आणि त्याच्या विश्वासू सैनिकांना होती. या किल्ल्यात प्रवेश करताना सुद्धा भुयारातून जावे लागत असे. संकट समयी सुखरूप निसटून जाताना भूयारांचा वापर होत असे.

१९४५ मध्ये शेरशहाचा मृत्यू झाला.१५७६ मध्ये मोंगलांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून शेरशहाचे कुटुंब आणि सैनिकांना मारहाण करून ताब्यात घेतले.या किल्ल्यात मोठा खजिना असल्याचे सांगितले जाते पण अजूनही कुणाला त्या खजिन्याचा शोध घेता आलेला नाही. कारण येथील भुयारे आणि तहखाने यांचे जाळे असे विचित्र आहे की लोक आत जायलाच आजही घाबरतात.