विराट कोहलीवर इन्स्टाग्राम पोस्ट वरून होणार कारवाई ?

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टवरून अडचणीत आला असून अॅडव्हरटायझिंग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एएससीआय ने विराट वर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन त्या संदर्भात विराटला नोटीस पाठविली आहे असे समजते.

टीम इंडिया इंग्लंड विरुध्द खेळणार असलेल्या पाच कसोटीची मालिका लवकरच सुरु होत आहे. त्या अगोदरच विराटच्या पोस्ट वरून वाद निर्माण झाला आहे. विराटने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात लवली प्रोफेशनल विद्यापीठाचा प्रचार करताना त्याने ऑलिम्पिक खेळाडूंचा उल्लेख केल्याने त्याच्यावर टीका सुरु झाली होती.

इकोनॉमिक टाईम्स मधील बातमीनुसार एएससीआयने पाठविलेल्या नोटिसीला विराटला उत्तर द्यावे लागेल. विराटने या पोस्ट मध्ये ‘ काय शानदार रेकॉर्ड! टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय चमूतील १० खेळाडू लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे आहेत. आगामी काळात लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने क्रिकेट मध्येही खेळाडू पाठवावेत. अश्या आणखी १० लवली विद्यापीठांची गरज आहे, जय हिंद’ असे म्हटले आहे.

विराट सोशल मीडियावर लोकप्रिय असून त्याचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. प्रमोशनल पोस्ट मधून विराट लाखोंची कमाई करत असतो. लवली युनिव्हरसिटी संदर्भातील पोस्ट त्यामुळेच चर्चेत आली असून विराट पैशांसाठी काहीही करू शकतो अश्या प्रतिक्रिया युजर व्यक्त करत आहेत.