पत्नीच्या नावावर असेल प्रॉपर्टी तर कर सवलतीचे अनेक फायदे

महिलांचा एकूण सहभाग वाढवा यासाठी विविध क्षेत्रात विशेष सुविधा आणि अधिकार दिले गेले आहेत. आयकर विभागाने सुद्धा असे अनेक अधिकार दिले असून त्याचा फायदा अधिक कर वाचविण्यासाठी पुरुष मंडळी घेऊ शकतात. फक्त त्यासाठी प्रॉपर्टीवर पत्नीचे नाव असणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीवर पत्नीचे नाव असेल तर हे फायदे मिळू शकतात.

महिलांसाठी गृहकर्जाच्या व्याजदरात सवलत दिली जाते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना व्याजदारावर ०.०५ टक्के अधिक सवलत आहे. काही राज्यात महिलांच्या नावावर प्रॉपर्टी घेतली तर स्टॅम्प ड्युटी मध्येही सवलत मिळते. पुरुषांसाठी मुद्रांक शुल्क ६ टक्के तर महिलांसाठी ते चार टक्के आहे.

काही महानगरपालिका सुद्धा प्रॉपर्टी महिलेच्या नावावर नोंदली गेली असेल तर मालमत्ता करात सवलत देतात. २०११-१२ मध्ये महिलांसाठी जास्त करसवलती होत्या पण २०१२ पासून महिला आणि पुरुष दोघांसाठी समान कर आकाराला जातो आहे. पाच लाख वार्षिक उत्पन्न असेल तर २.५ लाखावर कर नाही. पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर उरलेल्या रकमेवर सुद्धा कर रिबेट मिळते. हा नियम पुरुष आणि महिला दोघांनाही लागू आहे.