अमेरिकेत दोन महिन्यानंतर पुन्हा मास्क, करोना वाढला
जगाची महासत्ता अमेरिकेला करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटने चांगलाच इंगा दाखवला असून तेथील संक्रमितांची संख्या एका दिवसात ६० हजारांवर गेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देण्यात आलेला मास्क मुक्तीच्या निर्णय बदलावा लागला आहे. सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शन तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावली नुसार सार्वजनिक ठिकाणी, बंद जागेत, शाळा कॉलेज मध्ये मास्क वापरले जावेत अश्या सूचना जारी केल्या आहेत.
अमेरिकेत ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाही करोना संसर्ग होत असून त्यामुळे निराळेच संकट उभे राहिले आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका होण्यची शक्यता कमी असली तरी या लोकांच्या मुळे लस न घेतलेल्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. मे महिन्यापेक्षा हे संक्रमण त्यामुळे वेगळे असल्याचे तज्ञ सांगत आहेत. शिवाय लसीकरणाचा वेग कमी आणि संक्रमण वेग जास्त अशी सध्याची परिस्थिती आहे.
महामारी रोग तज्ञ डॉ. फॉसि म्हणाले, अमेरिकेतील एकूण परिस्थिती पहिली तर सीडीसीने मास्क वापरले गेले पाहिजेत असा जो नवा नियम केला तो योग्य आहे. दोन महिन्यापूर्वी मास्क पासून मुक्ती दिली गेली होती पण परिस्थिती जशी असेल त्यानुसार नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत. करोनाच्या डेल्टा व्हेरीयंट मुळे संक्रमण वाढण्याचा वेग मोठा आहे आत्तापर्यंत ८४ देशात हे व्हेरीयंट सापडले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा डेल्टा हे सर्वाधिक संक्रामक व्हेरीयंट असल्याचे जाहीर केले आहे.