माहिती अधिकारातून मुंबई महानगरपालिकेचा पर्दाफाश; खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण


मुंबई: गेल्या 24 वर्षात मुंबई महानगरपालिकेने रस्ते, अंतर रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर 21 हजार कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे एखाद्या पालिकेच्या बजेटएवढा हा पैसा खर्च करूनही खड्डे आणि रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असून दरवर्षी त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करावी लागत असल्याचे उघड झाले आहे.

माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेने गेली 24 वर्षे म्हणजे 1997 पासून नवे आंतररस्ते, खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या 24 वर्षात सर्वात जास्त खर्च 2014- 15 मध्ये झाला. या वर्षी 3201 कोटी रुपये रस्ते कामांवर खर्च करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2015मध्ये 34 रस्ते दुरुस्तींतील घोटाळाही चांगलाच चर्चेत राहीला होता. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली होती. 2002- 03 मध्ये सर्वात कमी 80.5 कोटींचा खर्च झाला.

दरम्यान हा मुद्दा भाजप आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला आहे. माहिती अधिकारातील कागदपत्रे दाखवून ही वस्तुस्थिती साटम यांनी समोर आणली आहे. गेली दोन तप मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरचे खड्डे, रस्तेदुरुस्ती यांवर केलेला हा खर्च एखाद्या दुसऱ्या लहान शहराच्या महापालिकेचे बजेटही असू शकला असता. पण रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर हजारो कोटी करुनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था जैसे थेच असल्याची टीका साटम यांनी केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या टोळीने तुमच्या आमच्या कराचे 21 हजार कोटी रुपये खड्ड्यात घातले. त्यामुळे मुंबई शहरातील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला असतो. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते मुंबईत नाहीत. महानगरपालिकेने हे पैसे खड्ड्यात घातले आहेत. हा भ्रष्टाचार आणि वाझेगिरी करणारे कोण आहेत? हा माझा सवाल असल्याचे अमित साटम यांनी म्हटले आहे.