
लखनऊ – राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाबरोबर युती करेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी
मंगळवारी लखनऊमध्ये केके शर्मा होते. शर्मा यांनी उत्तर प्रदेश प्रेस क्लबमध्ये माध्यमांना सांगितले की, उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखे उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपला रोखू, असे केके शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा पुढे म्हणाले की, पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रवादीला उठवावा लागेल कारण तेथील भाजप सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि आवाज दडपला जात आहे.
शर्मा म्हणाले की, जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला काय हरकत नसावी. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस १ ऑगस्टपासून राज्यभर राज्य वाचवा, संविधान वाचवा आंदोलन सुरू करेल, ज्यामध्ये शेतकरी व युवकांवर लक्ष केंद्रीत केल्या जाईल.
