भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करणार सात सदस्यीय समिती


मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांनी बुधवारी परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील.

एका बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली. दरम्यान, हे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढल्याची चर्चा होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ही कारवाई बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून केली होती.

आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळकविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला होता. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हे अडचणीत आले होते.