जागतिक वारसा यादीत चिलीमधील ७ हजार वर्षे जुन्या ममीजचा समावेश


युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीत चिलीमधील चिंचोरो ममीजचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा युनायटेड नेशन्सच्या सांस्कृतिक संघटनेने ट्विटरवर केली. चीनच्या अध्यक्षतेखाली युनेस्कोची व्हर्चुअल बैठक झाली. यावेळी चिंचोरो संस्कृतीच्या अनन्यसाधारण आणि जागतिक महत्व असलेल्या वसाहतींना युनेस्को आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देत आहे, असल्याचे चिली मानववंशशास्त्रज्ञ बर्नार्डो अरिझा यांनी सांगितले.

२०व्या शतकाच्या सुरुवातीस चिंचोरोमधील ममी जगातील सर्वात प्राचीन असून त्यांच्या शोध मॅक्स उहले यांनी उत्तर चिलीमध्ये लावला होता. या ममीज तब्बल ७ हजार वर्ष जुन्या असून इजिप्तमधील ममीजपेक्षा २ हजार वर्ष जुन्या आहेत. चिंचोरो या शब्दाचा अर्थ ‘मासेमारी बोट’ असा आहे. चिंचोरोमध्ये ७ हजार वर्षांपूर्वी मच्छिमारांचे आणि शिकाऱ्यांचे वास्तव्य होते. ते उत्तर-चिलीतील अटाकामा वाळवंटाच्या किनारपट्टीवर राहून लूटा व्हॅलीपासून लोआ नदीपर्यंत आणि दक्षिणी पेरूमध्ये वास्तव्य करत होते. याठिकाणी प्रशांत महासागर आणि वाळवंट एकमेकांना भेटतात.

दरम्यान, आतापर्यंत ३०० ममीज याठिकाणी आढळल्या असून त्या लाल, काळ्या रंगांच्या आणि बँडेज केलेल्या आहेत. ममी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी शरीरातील अवयव, आतडे आणि उती काढून टाकल्या जातात. त्यानंतर मृतदेहाची त्वचा काढून काठी आणि प्राण्यांच्या केसांचा वापर करून पुन्हा शरीर तयार केले जाते. तर दाट काळ्या केसांचे डोके बनवले गेले. त्यानंतर त्या ममी लाल आणि काळ्या रंगाने रंगवण्यात आल्या. त्यासाठी मँगनीज, आयरन ऑक्साईड आणि रंगद्रव्यांचा वापर करण्यात आला.

तज्ज्ञांनी या ममीज तयार केल्या होत्या. या ममीज येथील समुदायातील पहिल्या लोकसंख्येच्या सर्जनशीलतेचा उत्तम नमुना आहेत. पण मृत पावलेल्या लोकांच्या ममी का बनवण्यात आल्या, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याचे अरिझा म्हणतात. ते अरिका शहरामध्ये तारापाका विद्यापीठाच्या चिंचोरो सेंटरचे संचालक आहेत.