विहीर खणताना सापडला ५१० किलोचा नीलम

श्रीलंकेत एका घराच्या परसदारी विहीर खोदण्याचे काम सुरु असताना जगातला सर्वात मोठा नीलम सापडल्याचा दावा घरमालकाने केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या नीलमची किंमत १० कोटी डॉलर्स असून आत्तापर्यंत सापडलेल्या नीलममध्ये हा सर्वात मोठा म्हणजे ५१० किलोचा असल्याचे सांगितले जात आहे. याला सेरेंडीपीटी सफायर असे नाव दिले गेले आहे. हा नीलम २५ लाख कॅरेटचा आहे.

बीबीसीच्या बातमीनुसार डॉ. गमा यांनी त्यांच्या घराच्या परसदारी विहीर खोदताना हा नीलम मजुरांना सापडल्याचे म्हटले आहे. या जमिनीत मौल्यवान रत्ने सापडू शकतील याची कल्पना मजुरांना दिली गेली होती. डॉ. गमा स्वतः मौल्यवान रत्नांचे व्यापारी आहेत. ते म्हणाले हा खडक साफ करायला १ वर्ष लागेल. त्यानंतर त्याच्या गुणवत्तेचे विश्लेषण करून सरकारकडे त्याची नोंदणी केली जाईल. या खडकाचे काही तुकडे वेगळे झाले आहेत त्यावरून हे नीलम रत्न फार उच्च दर्जाचे आहे असा अंदाज केला जात आहे.

रत्नापूर शहरात हा नीलम सापडला असून हे शहर जेम सिटी या नावानेच ओळखले जाते. यापूर्वी सुद्धा या गावात अनेक मौल्यवान रत्ने मिळाली आहेत. श्रीलंका नीलम व अन्य मौल्यवान रत्नांचा मोठा निर्यातदार देश आहे.