टोक्यो ऑलिम्पिक- सुवर्णपदक चावू नका- खेळाडूंना सूचना

खेळाची सुद्धा स्वतःची अशी काही खास परंपरा, संस्कृती, इतिहास असतो आणि शतकानुशतके त्याचे पालन खेळाडू करतात. पोडीयमवर उभे राहताना मिळविलेले सुवर्णपदक विजयी मुद्रेने स्वीकारायचे आणि ते चावून पाहायचे हा अशाच परंपरेचा एक भाग. पण जपान मध्ये सुरु असलेल्या टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये आयोजकांनी खेळाडूंना पदक दातांनी चावू नका अशी सूचना दिली आहे. या मागचे कारण मजेदार आहे.

जपान तंत्रज्ञान विकासात जगात विख्यात देश आहे. ऑलिम्पिक बाबतीत सुद्धा त्यांनी अनेक नवीन प्रयोग केले आहेत. यात स्पर्धेची मेडल बनविताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याचा वापर केला गेला आहे. जुने मोबाईल, लॅपटॉप्स, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे रिसायकल करून त्यातून ५ हजार मेडल्स बनविली गेली आहेत. हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जपानी नागरिकांनी दान म्हणून दिले होते. ऑलिम्पिक मेडल्सचा इतिहास मोठा आहे. पूर्वी शुध्द सोन्याची पदके दिली जात. सोने हा नरम धातू असल्याने तो चावला तर त्यावर दाताच्या खुणा उठतात, सोन्याची शुद्धता तपासून पाहण्याचा तो एक मार्ग होता.

टोक्यो ऑलिम्पिक आयोजकांनी एका अमेरिकी अॅथलेटचा फोटो शेअर करून ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये ‘ अगोदरच स्पष्ट करत आहोत, मेडल तोंडात घालू नका. इलेक्ट्रॉनिक वेस्ट पासून ते तयार केले आहे त्यामुळे ते चावायची गरज नाही. तरीही तुम्ही ते करणार’ असे लिहून पुढे स्मायली टाकली गेली आहे.