विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची पहिल्यांदा भेट


नवी दिल्ली : आज राजधानी दिल्लीत एकमेकांमध्ये विस्तवही न जाणाऱ्या देशातील दोन बड्या नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर आज पहिल्यांदा मोदी-ममतांची भेट झाली.

दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीत मी कोरोना आणि राज्यातील कोरोना लसी आणि औषधांची उपलब्धता हा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दाही मी मांडला. या मुद्द्यावर ‘मी बघतो’ असं मोदींनी सांगितले.

सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये काँग्रेस नेते कमलनाथ, आनंद शर्मा यांचा समावेश होता. सूत्रांच्या मते, ममता बॅनर्जी या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

काल म्हणजे सोमवारी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या. त्या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ममतांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट होत आहे. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ममता बॅनर्जी उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.