कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा टी-२० सामना पुढे ढकलला


कोलंबो – शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी होती. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार होता, पण टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव बायो बबलमध्ये झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले असून आजचा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाईल, असे सुत्रांनी एएनआयला सांगितले आहे.

कोरोनाची कृणालला लागण झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियातील तीन खेळाडू शुबमन गिल, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर चांगल्या लयीत असलेल्या पृथ्वी आणि सूर्यकुमारला इंग्लंडमधून बोलावणे आले होते. पण आता त्यांच्या जाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती आणि टी-२० मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ विश्लेषक एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली होती.