पॉर्नोग्राफी प्रकरणी उच्च न्यायालयाचा शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश


मुंबई : मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोन अभिनेत्रींना मुंबई उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत तूर्तास दिलासा दिला आहे. यावर नुकतीच न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी पार पडली. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या अटकेनंतर पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी आघाडी उघडल्याचे स्पष्ट असल्यामुळे या प्रकरणी आणखीही काही नाव येत्या दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शर्लिन चोप्राने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जाची गंभीर दखल घेतल शर्लिनला 15, 16, 17 मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहून चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत तिच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे, निर्देशही मुंबई पोलिसांना देण्यात आले होते.

दिलेल्या निर्देशांनुसार शर्लिन चोप्रा वेळोवेळी चौकशीला हजर झाल्याने तिच्या अटक पूर्व जामीनाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. तर अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. युकेतील एका कंपनीने शर्लिन चोप्रा हिच्याशी अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता.

पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आय. टी. कायद्यांतर्गत 6 नोव्हेंबर 2020 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर अभिनेत्री पूनम पांडेविरोधातही मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रीकरणाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

त्यात अटकपूर्व जामीनासाठी तिनेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात शर्लिन आणि पूनमच्या अटकपूर्व जामीनावर एकत्र सुनावणी झाली त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत शर्लिन आणि पूनम विरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यास मुंबई पोलिसांना मनाई केली आहे.