Glenmark Sciences च्या आयपीओंची पहिल्याच दिवशी बाजारात तुफान कामगिरी


मुंबई – ग्लेनमार्क फार्मास्युटीकलची उपकंपनी असलेल्या ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडने २७ जुलै म्हणजेच आजपासून आपले आयपीओ खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या आयपीओला अर्थात प्रारंभिक समभाग विक्रीला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७९ टक्के आयपीओ खरेदी देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

कंपनीने २६ जुलै रोजी आपल्या अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल ४५४ कोटी रुपयांचे भांडवल उभे केल्यामुळे समभागांची संख्या कमी करून १.५ कोटी रुपयांचे समभाग कंपनीने उपलब्ध करून दिले होते. पण त्यात कंपनीकडे १.८ कोटी रुपयांच्या समभागांसाठी बोली लागली आहे. येत्या २९ जुलैपर्यंत ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडचे आयपीओ खरेदी करता येणार आहेत.

तब्बल १ हजार ५१५ कोटींचे भांडवल ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडने आयपीओमधून उभारण्याचे नियोजन केले आहे. त्याव्यतिरिक्त १ हजार ६० कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स आणि ६३ लाख इक्विटी शेअर्सवरच्या ऑफर फॉर सेल्समधून उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे. यासाठीचा प्राईस ब्रँड अर्थात किंमतीचा टप्पा ६९५ रुपये ते ७२० रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. खरेदीसाठी किमान लॉट साईज २० शेअर्सची निश्चित करण्यात आली असून त्यापुढे देखील २० च्या पटीमध्येच तुम्हाला शेअर्स खरेदी करता येणार आहेत.

ग्लेनमार्क कंपनी ही अग्रगण्य विकसक आणि उत्पादक असून उच्च नीतिमूल्य असलेली कंपनी असल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टने म्हटले आहे. याशिवाय, ग्लेनमार्क जगभरातील १६ मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करते. जागतिक स्तरावर एपीआय व्यवसाय वाढत जाण्याचा कल दिसून येत असल्याचे देखील आयसीआयसीआय डायरेक्टने नमूद केले आहे.

या आयपीओसोबतच गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसॉर्डर, अँटि इन्फेक्टिव्ह आणि इतर उपचारांच्या क्षेत्रातील API ची देखील ग्लेनमार्ग लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी विक्री करते. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ग्लेनमार्ग लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचे वार्षिक उत्पन्न १ हजार ५३७ कोटी तर निव्वळ नफा ३१४ कोटी एवढा होता.