केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती; पुढच्या महिन्यापासून होणार लहान मुलांचे लसीकरण


नवी दिल्ली – कोरोनाची देशातील दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरणावर सरकारकडून जोर दिला जात आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संक्रमण होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे लहान मुलांबाबत पालकांना चिंता सतावत होती. या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. भारतात ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस येईल, अशी माहिती त्यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे.

पुढच्या महिन्यापासून सरकार लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे. कारण अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची २ वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे.

लहान मुलांवर सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे ट्रायल सुरु आहे. त्याचा निकाल लवकरच येईल, असे एम्स प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर, झायडस कॅडिलाने १२ ते १८ वयोगटातील डीएनए आधारीत कोरोना लसीचे क्लिनिकल ट्रायल नुकतेच पूर्ण केलं आहे. लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार असल्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे.

फायजर-बायोएनटेकच्या लसीही प्रतिक्षेत आहेत. भारताकडून मान्यता मिळाल्यास हा पर्यायही उपलब्ध होणार आहे. मॉडर्ना आणि फायजर भारतात लसीचा पुरवठा करण्यापूर्वी इंडेम्निटी क्लॉज करण्यावर जोर देत आहे. यूरोपमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुलांना मॉडर्ना लस देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीचे दोन डोस असणार आहेत. या लसीचे ३ हजार ७३२ मुलांवर परीक्षण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ४४ कोटीहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस सर्व जणांचे लसीकरण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.