लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मुंबईतील डॉक्टरला झाला तीन वेळा कोरोना


मुंबई – जून २०२० पासून मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर तीनवेळा कोरोनाबाधित आढळली आहे. चिंतेची बाब म्हणजे यावर्षी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डॉक्टर दोनदा कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आढळली. आतापर्यंत तीन वेळा पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉ सृष्टि हलारी म्हणाल्या, वारंवार माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्या भ्रमित झाल्या असल्याची माहिती त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

मुंबईमधील संसर्गासंदर्भात कोरोनाणूच्या रचनेमधील बदल आणि जडणघडणीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सध्या वेगवेगळ्या भागांमधील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉ. सृष्टी यांचा स्वॅबही घेण्यात आला आहे. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा संसर्ग होणे हे खरे तर गोंधळात टाकणारे असल्याचे डॉ. सृष्टी हलारी सांगतात.

लसीकरणानंतरही डॉ सृष्टी यांना कोरोनाची लागण कशी झाली, याची तपासणी करण्यासाठी स्वॅब गोळा करण्यात आला आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेने आणि खासगी रुग्णालयात सॅंपल देण्यात आले आहेत. संसर्गाचे कारण शोधण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असताना डॉ. हलारी १७ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर यावर्षी २९ मे आणि ११ जुलै रोजी त्यांना संसर्ग झाला.

डॉ. सृष्टीवर उपचार करत असलेले डॉ. मेहुल ठक्कर म्हणाले, मे महिन्यात झालेला दुसरा संसर्ग जुलैमध्ये पुन्हा सक्रिय झाला असावा. तसेच एफएमआरचे संचालक डॉ. नर्गिस मिस्त्री म्हणाले की, कदाचित कोरोनाचा नवीन प्रकार समोर येत असेल.