मीराबाई चानू आयुष्यभर घेऊ शकणार मोफत पिझ्झाचा आनंद

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये वेट लिफ्टिंग खेळात देशाला पहिले रजत पदक मिळवून देणारी मीराबाई चानू मायदेशी परतली असून तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. यात एका अनोखे आणि अनपेक्षित बक्षीस मीराबाईला मिळाले आहे. ते म्हणजे आयुष्यभर मोफत पिझ्झा मिळण्याचे. डोमिजोज पिझ्झाने हे अनोखे बक्षीस चानूला दिले आहे.

त्याचे झाले असे की मीराबाई पदक जिंकून मायदेशी परतली तेव्हा एका पत्रकाराने तिला आता सर्वप्रथम कुठली इच्छा पूर्ण करणार असा प्रश्न विचारला. मिराबाईने हसत हसत अगदी आनंदात पोटभर पिझ्झा खाणार असे उत्तर दिले. विशेष म्हणजे मीराबाईचे हे उत्तर तिच्या एका चाहत्याने ट्विट केले मात्र शनिवारीच डॉमिनोजने मीराबाईच्या घरी पिझ्झा पोहोचता केला. पण मीराबाई शनिवार ऐवजी रविवारी घरी पोहोचली आहे हे समजताच डोमिनोजने रविवारी पुन्हा मीराबाईच्या घरी पिझ्झा पोहोचता केला.

इतके करून डॉमिनोज थांबली नाही तर त्यांनी मीराबाईच्या चाहत्याने केलेल्या ट्विटला उत्तर दिले आणि त्यात ‘तुम्ही सांगितले. आम्ही ऐकले. चानूला यापुढे कधीच पिझ्झा खाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे चानूला तिच्या आयुष्यभर आम्ही मोफत पिझ्झा देणार आहोत. देशासाठी तिने मेडल आणले या बद्दल चानूचे अभिनंदन. १ अब्ज भारतीयांचे स्वप्न साकार झाले यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही’ असे म्हटले आहे.

चानुने ४९ किलो वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिक मध्ये रजत पदकाची कमाई केली असून तिने विश्व चँपियनशिप, राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा अनेक पदके मिळविली आहेत. २०१८ मध्ये मीराबाई चानूला पद्मश्री देऊन गौरविले गेले आहे.