ऑगस्ट ११ ते १३ दरम्यान होणार उल्कांची बरसात

रात्रीच्या दाट अंधारात चांदण्यांनी लगडलेले आकाश पाहण्याचा छंद अनेकांना असतो. टेलिस्कोप मधून पृथ्वी बाहेरच्या जगात रमणारे अनेक आहेत. अश्या खगोल प्रेमींसाठी आकाशात एक सुंदर शो सुरु झाला आहे. दरवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये पर्सीडस उल्का वर्षाव नावाने हा शो होतच असतो. त्याचा सर्वाधिक रोमांच ऑगस्ट मध्ये असतो. यंदाही ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान या सर्वात लोकप्रिय उल्का वर्षावाचा पिक टाईम आहे.

दरवर्षी १७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान पृथ्वी स्विफ्टटटल धुमकेतूच्या मार्गाने प्रवास करते. जेव्हा पृथ्वी या मार्गावरच्या सर्वात दाट आणि धूळ भरल्या भागातून प्रवास करते तेव्हा जास्त उल्का दिसतात. २०१६ मध्ये या काळात ताशी १५० ते २०० उल्का पडताना दिसल्या होत्या. यंदा हा वेग ताशी ६० उल्का पर्यंत असेल असे सांगितले जात आहे.

यंदा कमी उल्का दिसतील कारण आकाशात चंद्र असेल आणि त्याच्या प्रकाशामुळे उल्का कमी दिसणार आहेत. मध्यरात्रीनंतर उत्तरेकडे, अंधाऱ्या जागी जाऊन पाहिल्यास उल्का वर्षाव चांगला दिसणार आहे. उल्का पाहताना जमिनीवर झोपून आकाशाकडे तोंड करावे यामुळे जास्त उल्का पाहता येतात असा सल्ला जाणकार देतात.