ब्रिटीश हायकोर्टने  केले जाहीर , माल्या दिवाळखोर

ब्रिटीश हायकोर्टाने फरारी विजय माल्या याला दिवाळखोर घोषित केले आहे. यामुळे भारतीय बँकांना माल्या यांच्या जगभरात जेथे म्हणून मालमत्ता आहेत त्या जप्त करण्याचा मार्ग खुला झाला आहे. माल्या याने भारतातील विविध बँकातून किंगफिशर कंपनीच्या नावावर ९ हजार कोटी पेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेतले होते आणि किंगफिशर कंपनी बुडाली तेव्हा माल्या देशातून फरार झाला होता. सध्या त्याचे वास्तव्य लंडन येथे आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँक संघाने ब्रिटीश कोर्टात माल्या विरुद्ध याचिका दाखल करून माल्या फसवणूक आणि मनीलाँड्रींग प्रकरणात वाँटेड असल्याचे म्हटले होते. माल्या सध्या लंडन मध्ये जामिनावर असून त्याने तेथे आश्रय द्यावा यासाठी अपील केले आहे.

ब्रिटन हायकोर्टाने व्हर्च्युअली सुनावणी करताना माल्या याला दिवाळखोर जाहीर केले आहे. जज मायकल ब्रिग्स यांनी माल्या निश्चित कालावधीत कर्जाची रक्कम चुकवू शकेल ही शक्यता कमीच असल्याचे मत व्यक्त करून वरील निर्णय दिला. मल्ल्याच्या वकिलांनी या विरुद्ध वरच्या कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान अंमलबजावणी संचालनालय( ईडी) कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मनीलाँड्रींग विरोधी कायद्याखाली किंगफिशर एअरलाईन्सच्या अॅटॅच केलेल्या शेअर्स मधून १ टक्का हिस्सा विक्री करून एसबीआय नेतृत्वाखालील कर्जदात्या बँक संघाला ७९२.११ कोटी रुपये परत मिळाले आहेत. ही रक्कम बुडीत रकमेच्या ५८ टक्के असल्याचे समजते.