जुन्या पडीक हवेलीला नवा उजाळा, एका रात्रीचे भाडे १ लाख

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे तुम्ही मनापासून मेहनत केली असेल तर प्रयत्नाला यश मिळतेच. याचा अनुभव श्रीलंकेतील चार मित्र सध्या घेत आहेत. इंटिरीयर डिझायनर डीन शार्प हा याचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

श्रीलंकेच्या जंगलात १०० वर्षे जुनी पडकी हवेली डीन याच्या दृष्टीस पडली आणि त्याने त्याच्या तीन मित्रांसह ही हवेली खरेदी केली. त्यासाठी ३ कोटी २२ लाख रुपये मोजले गेले तेव्हा डीन याला सर्वानी वेड्यात काढले. मात्र डीन याने प्रयत्न सुरुच ठेवले आणि या हवेलीचे रिनोव्हेशन सुरु केले. अतिशय मेहनत घेऊन चार वर्षात त्याने हे काम पूर्ण केले आणि आज या हवेलीत एका रात्रीच्या वास्तव्यासाठी पर्यटक १ लाख रुपये मोजायला तयार आहेत.

श्रीलंकेच्या वेलीगामा मध्ये एका श्रीमंत व्यक्तीने पत्नीसाठी ही हवेली १९१२ मध्ये बांधली होती ती डीन याने २०१० मध्ये खरेदी केली. या हवेलीला त्याने हलाल कांड असे नाव दिले आहे. खरेदीच्या वेळी ही हवेली अगदी खराब अवस्थेत होती. छतावर झाडे वाढली होती. वटवाघळे, वाळवी लागली होती. टाईल्स उखडलेल्या होत्या. डीन याने अगदी साधेपणाने या हवेलीचे इंटिरियर करून तिला नवे रूप दिले. घरात मोकळेपणा ठेवला आणि एक स्वीमिंग पूल बांधला. पाच बेडरूमच्या या हवेलीत एकावेळी १२ जण राहू शकतात.

अगदी थोडक्या काळात ही हवेली श्रीलंकेत बेस्ट व्हेकेशन स्पॉट म्हणून प्रसिद्धीस आली असून डीन आणि कंपनी ही हवेली भाड्याने देऊन खोऱ्याने पैसा मिळवीत आहेत.