करोना फैलावात वाढत्या प्रदूषणाचा हातभार – नवे संशोधन

जेव्हा जेव्हा प्रदूषणात वाढ झाली तेव्हा तेव्हा कोविड १९ विषाणू अधिक घातक स्वरुपात आणि वेगाने फैलावल्याचे नव्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. करोना उद्रेक झाल्यापासून गेले दीड वर्ष सतत वैज्ञानिक करोनावर संशोधन करत असून प्रत्येक वेळी या छोट्या विषाणूशी संबंधित एकापेक्षा एक भयंकर गोष्टी समोर आल्या आहेत.

जर्नल ऑफ एक्स्पोजर सायन्स अँड इनोव्हेटीव्ह एपिडेमॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या नव्या संशोधनात वैज्ञानिकांच्या टीमने करोना फैलावात प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा जेव्हा प्रदूषणात वाढ झाली तेव्हा अधिक वेगाने फैलावण्याची संधी कोविड १९ ला मिळाली असा त्यांचा दावा आहे.

डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॅनियर किसर या संदर्भात माहिती देताना सांगतात, नेवाडाच्या रेनो भागातही या संशोधनादरम्यान पाहणी केली गेली. कॅलिफोर्निया मध्ये जंगलांना आग लागली तेव्हा प्रदूषण वाढले होते आणि त्याकाळात करोना टेस्ट पोझिटिव्ह येण्याचे प्रमाण सुद्धा १८ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेत ८० पेक्षा जास्त जंगलात आगी लागल्या आणि त्याचे प्रदूषण न्युयॉर्क पर्यंत पसरले त्यामुळे न्युयॉर्क मध्येही करोना संक्रमण वेगाने वाढले.

करोनावर नियंत्रणासाठी लसीकरण हवेच तसेच मास्कचा वापर हवा असे मत या वैद्यानिकांनी व्यक्त केले आहे. आगी लागल्या की त्या दरम्यान वातावरणात २.५ मायक्रोमिलीचे सुक्ष्म कण वाढतात आणि या कणांच्या बरोबर करोना विषाणू शरीरात सहज प्रवेश करू शकतो. जास्त तापमान, आर्द्रता, वायू प्रदूषण, जलवायू परिवर्तन ही सुद्धा करोना केस मध्ये वाढ होण्याची कारणे आहेत असेही दिसून आले आहे.