ऑनलाईन स्कॅममध्ये फसण्यात भारतीय पुरुष आघाडीवर

मायक्रोसॉफ्टने २०२१चा ग्लोबल टेक सपोर्ट स्कॅम रिसर्चचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला असून गेल्या १२ महिन्यात भारतीय ग्राहक या प्रकारच्या फसवणुकीचे सर्वाधिक बळी ठरले असल्याचे दिसून आले आहे. या वर्षात ६९ टक्के भारतीय ग्राहक अश्या स्कॅममध्ये फसले असून त्यात भारतीय पुरुष ग्राहकांचे प्रमाण ३७ टक्के तर भारतीय महिला ग्राहकांचे प्रमाण २७ टक्के असल्याचे नमूद केले गेले आहे.

या तुलनेत जागतिक स्तरावर अश्या स्कॅमना बळी पडलेल्यांचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी झाले असून ते ५९ टक्क्यांवर आहे. या संदर्भात भारतात केलेल्या सर्व्हेक्षणात सामील झालेले सुमारे अर्धे ग्राहक (४८ टक्के) अशा फसवणुकीचे शिकार बनले आहेत. असेही दिसून आले की तीन पैकी एका भारतीयाने ऑनलाईनवरून विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱयांशी बातचीत सुरूच ठेवली होती आणि त्यामुळे त्यांनी पैसे गमावले.

२०२१ मध्ये २४ ते ३७ वयोगटातील ग्राहक अश्या प्रकारच्या फसवणुकीस अधिक प्रमाणावर बळी पडतील असा अंदाज केला गेला होता. मायक्रोसॉफ्ट संपूर्ण जगभर दर महिन्याला तांत्रिक फसवणूक कशी वाढते त्यासंदर्भात जागृती करणे आणि ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे कसे करावे याचे शिक्षण देण्यासाठी असे सर्व्हेक्षण करते. त्यात आशियातील सर्वात मोठ्या ४ मार्केट मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूर सह १६ देशात असे सर्व्हेक्षण केले गेले.

भारतात २०२१ मध्ये ऑनलाईन स्कॅम फसवणुकीत ग्राहकांचे सरासरी १५३३४ रुपये नुकसान झाले असून त्यातील काही भाग ग्राहकांना परत मिळाला आहे असे दिसून आले आहे.