देशात सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावात घसरण होत असल्याचे दिसत आहे. भारतात सध्या 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची दररोज नोंद केली जात आहे. देशात सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

चार लाखांहून अधिक देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आहे. एकूण 4 लाख 11 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 11 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार 967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 5 लाख 3 हजार रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 25 जुलैपर्यंत 43 कोटी 51 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 18 लाख 99 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे 45.37 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 74 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 11.54 लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात काल (रविवारी) दिवसभरात 6 हजार 843 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 5 हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 35 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात काल 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.

सध्या राज्यात अहमदनगर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. सातारा 665, कोल्हापूर 582, सांगली 691, अशी रुग्णांची नोंद काल झाली आहे. तर भंडारा, वर्धा, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 7681 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.