मीराबाई चानूला मणिपूर सरकारचे मोठे गिफ्ट..! होणार पोलीस अधिकारी


मणिपूर – टोकियो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत मीराबाई चानूने इतिहास रचला. ४९ किलो वजनी गटात तिने रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मीराबाईवर या कामगिरीनंतर कौतुकांचा वर्षाव होत आहे. एवढेच काय, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी तिच्यासाठी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. तिला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचेही सांगितले होते. आता मणिपूरच्या पोलीस विभागात मीराबाई अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून काम करणार आहे.

यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मीराबाईला हे पद मणिपूर सरकारने दिले आहे. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात वजन उचलले.

मीराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही एन बिरेन सिंग यांनी शेअर केला होता. यापुढे तू रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नसल्याचे मुख्यमंत्री मीराबाई चानूला व्हिडीओत सांगत होते. तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट मी राखीव ठेवत असल्याचे आश्वासन त्यांनी मीराबाईला दिले होते.

भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची चानूने नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.