बीसीसीआयकडून सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉच्या इंग्लंड दौऱ्यावर शिक्कामोर्तब


नवी दिल्ली – आता इंग्लंड दौऱ्यावर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव जाणार आहेत. आज सोमवारी याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या तीन खेळाडूंच्या दुखापतीनंतर या दोन्ही खेळाडूंना बदली म्हणून इंग्लंडला पाठवले जात आहे. इंग्लंड दौर्‍यावर शुबमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाले आणि हे तिन्ही खेळाडू आता इंग्लंड कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे सांगितले गेले आहे, की अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्याला इंजेक्शन देण्यात आले आहे. पण या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. दुसरीकडे, सराव सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज आवेश खानच्या डाव्या हाताच्या अंगठ्यात दुखापत झाली.

बीसीसीआयने सांगितले, की यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची प्रकृती चांगली असून त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. वैद्यकीय पथकाची तपासणी केल्यानंतर त्याने मालिकेची तयारी सुरू केली आहे. गोलंदाजीचे कोच भारत अरुण, यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा आणि सलामीवीर फलंदाज अभिमन्यु ईश्वरन यांनीही आयसोलेशन पूर्ण केले आहे आणि ते संघात सामील झाले आहेत.

सध्या श्रीलंका दौर्‍यावर सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ असून हे दोन्ही खेळाडू कमाल फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ६२च्या सरासरीने १२४ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२२.७७ असा होता. सूर्यकुमार यादवला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने लंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही अर्धशतक ठोकले. पृथ्वी शॉनेही तीन सामन्यात ३५च्या सरासरीने १०५ धावा केल्या. पृथ्वी शॉने आक्रमक सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आता हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होतील.

इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृध्दिमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.