युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत रामप्पा मंदिराचा समावेश

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी रविवारी युनेस्कोने तेलंगाना मधील मुलुगु जिल्यातील पालमपेट येथे असलेले ऐतिहासिक रामप्पा मंदिर जागतीक वारसा यादीत समविष्ट केल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. रुद्रेश्वर मंदिर असेही या मंदिराला म्हटले जाते. हे मंदिर १२१३ साली काकतीय साम्राज्य काळात बनविले गेले आहे म्हणजे ते ८०० वर्षे जुने आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून रामलिंगेश्वर ही येथील मुख्य देवता आहे. हे मंदिर राजाच्या आदेशावरून रामप्पा या त्याच्या सेनापतीने सतत ४० वर्षे परिश्रम करून बांधले त्यामुळे त्याचेच नाव या मंदिराला दिले गेले होते.

मंत्री किशन रेड्डी यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ मुळे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था युनेस्कोची बैठक २०२० मध्ये होऊ शकली नव्हती. २०२० आणि २०२१ च्या नामांकनातून निवड करण्यासाठीच्या बैठका आता ऑनलाईन होत असून रविवारी झालेल्या चर्चेत रामप्पा मंदिराला जगातील वारसा यादीत स्थान दिले गेले. यासाठी पुरातत्व विभाग गेली १० वर्षे तयारी करत होता.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे तसेच तेलंगाना जनतेचे विशेष अभिनंदन केले असून उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्या असे आवाहन केले आहे. विशिष्ट शैली, अप्रतिम कलाकुसर, तंत्रज्ञान आणि अजोड मूर्तिकला याचे सुंदर दर्शन या मंदिरात होते. भिंती, खांब आणि छतावर अप्रतिम नक्षी कोरली गेली आहे.