ब्रिटीश मार्लबोरो सिगरेट ब्रांड १० वर्षात होणार गायब

ब्रिटन मधील तंबाखू उत्पादने क्षेत्रातील १०० वर्षे जुनी दिग्गज कंपनी फिलीप मॉरिस पुढच्या १० वर्षात ब्रिटन मध्ये त्यांची सिगारेट विक्री बंद करणार आहे. त्यामुळे शतकभर ब्रिटीश आणि जगातील अन्य लोकांना धूम्रपानाचा आनंद देणारा मार्लबोरो सिगरेट ब्रांड पुढच्या १० वर्षात गायब होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या सिगरेट कंपनीचा हा निर्णय सध्या ब्रिटन मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी जेसेक ओत्साक यांनी मार्लबोरो बंद करणार असल्याची घोषणा केली असून यावेळी ते म्हणाले, ब्रिटनने धुम्रपान व्यसन संपविण्यासाठी मोहीम आखली आहे आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. येत्या १० वर्षात मार्लबोरो ब्रांड बाजारातून गायब होईल. तरीही ज्यांना स्मोकिंग करायचेच आहे त्यांच्यासाठी ई सिगरेट किंवा तंबाखू गरम करण्याचे उपकरण असे आधुनिक पर्याय स्वीकारावे यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. मात्र कंपनीची स्मोकिंग उत्पादने बंद केली जातील. यामुळे येत्या १० वर्षात ब्रिटन धुम्रपान समस्या सोडवू शकेल असे वाटते.

ब्रिटनने २०३० पर्यंत धुम्रपान मुक्त ब्रिटनसाठी योजना आखली आहे. त्यानुसार वेगवेगळया वयोगटातील स्मोकर्ससाठी जागृती करण्यात येत आहे. फिलीप मॉरिसचा तंबाखू उत्पादने विक्री बंद करण्याचा निर्णय ब्रिटन साठी महत्वाचा ठरणार आहे. गेली १०० वर्षे ही सिगारेट कंपनी ब्रिटीश जनतेची पहिली पसंत राहिली आहे.