ऑलिम्पिक मेडलविजेत्यांचे हसरे चेहरे दिसणार

टोक्यो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रविवारी केलेल्या एका नियम बदलामुळे ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या चेहरयावर फुललेले हास्य त्यांचे चाहते पाहू शकणार आहेत. कोविड १९ संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी यापूर्वी मेडल विजेते, प्रशिक्षक आणि संबंधित अधिकारी याना पदकदान कार्यक्रमात मास्क घालणे अनिवार्य केले गेले होते. या नियमात बदल केला असून पदक विजेते फोटो घेताना केवळ ३० सेकंदासाठी मास्क काढू शकणार आहेत. यामुळे खेळाडूच्या चेहऱ्यावरचे विजयी हास्य फोटोतून का होईना पण त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

रविवारी सकाळी नियमातील हा बदल जाहीर केला गेला असून त्याविषयी बोलताना आयोजक म्हणाले, टोक्यो ऑलिम्पिक २०२० प्ले बुक लक्षात घेऊन हा बदल केला गेला आहे. त्यानुसार पदक घेताना खेळाडू पोडीयमवर सोशल डीस्टन्सिंगचे पालन करतील आणि बिना मास्क ३० सेकंदात फोटो काढून घेऊ शकतील. सुवर्ण पदक विजेते मास्कसह सामुहिक फोटो काढू शकतील. खेळाडू मीडियासमोर फोटो काढू शकणार आहेत त्यामुळे त्यांच्या खेळ कारकिर्दीतल्या या ऐतिहासिक क्षणाच्या त्यांच्या चेहऱ्यावरील भावना मिडिया टिपू शकणार आहे.