आता पोस्टात सुद्धा बनणार पासपोर्ट

पासपोर्ट काढायचा म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात पासपोर्ट कार्यालयात लागलेल्या लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांचा हा भलामोठा गठ्ठा सांभाळत त्रासलेले इच्छुक. पण लवकरच या परिचित दृश्यात आता बदल होणार आहे आणि त्या साठी सहकार्याचा हात पुढे केला आहे भारतीय टपाल सेवेने. इंडिया पोस्ट लवकरच देशभरातील अनेक पोस्टात पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून देत आहे. पासपोर्ट साठी अर्ज सुविधा तसेच पासपोर्ट नोंदणी सुविधा यापुढे जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये ग्राहक घेऊ शकणार आहेत.

अर्थात त्यासाठी इच्छुकांना पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्विस सेंटरवर जावे लागेल. पोस्ट विभागाने या संदर्भातली आवश्यक माहिती त्यांच्या ट्विटर अकौंटवर शेअर केली आहे. त्यानुसार पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र हे पासपोर्ट ऑफिसची शाखा म्हणून काम करणार आहे. त्यात टोकन घेण्यापासून पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज अशी सुविधा मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर मिळालेल्या तारखेला रिसीटची हार्ड कॉपी आणि पासपोर्ट साठी लागणारी मूळ कागदपत्रे घेऊन पासपोर्ट सुविधा उपलब्ध असलेल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात जावे लागेल. पोस्ट ऑफिस मध्येच कागदपत्रांचे व्हेरीफीकेशन होणार आहे. पासपोर्ट संदर्भातली माहिती एसएमएस वरून कळविली जाणार आहे. या सर्व प्रोसेस साठी साधणार १५ दिवस लागणार आहेत असे समजते.