पेट्रिक सून जिऑन्ग आहेत जगातील सर्वात श्रीमंत डॉक्टर


श्रीमंत लोकांची यादी जाहीर करणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने जगातील सर्वात श्रीमंत डॉक्टरांच्या यादीत पेट्रिक सून जिऑन्ग यांना सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान दिले आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये जन्म झालेले पेट्रिक हे चिनी-अमेरिकन सर्जन आहेत. याशिवाय ते एक उद्योगपती आणि दान करणारे म्हणून देखील ओळखले जातात. ते 1381 करोड रुपये वार्षिक उत्त्पन्न असणाऱ्या आरोग्य कंपनी ‘नेंटवर्क्स एलएलसी’चे चेअरमन आहेत. त्याचबरोबर लॉस एंजिलिसमधील युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाचे एक्झिक्युटिव डायरेक्टर पद देखील त्यांच्याकडे आहे. याशिवाय अनेक आरोग्य संस्थांची वेगवेगळी पदे देखील त्यांच्याकडे आहेत.

शरणार्थी ते यशस्वी डॉक्टर
पेट्रिक यांचे आई-वडिल द्वितीय विश्वयुध्दादरम्यान शरणार्थीच्या रुपात दक्षिण अफ्रिकेमध्ये स्थायी झाले होते. आर्थिक परिस्थिती खराब असताना देखील पेट्रिक यांनी मेडिकल क्षेत्रात करिअर बनवण्याचा विचार केला. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय शास्त्रात पदवी आणि 1979 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. वैद्यकीय शास्त्रात पदवीधर झाल्यानंतर त्यांनी जोहन्सनबर्ग येथील जनरल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप पुर्ण केली. शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेला जात युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये वैद्यकीय प्रक्षिक्षण घेण्यास सुरूवात केली. 1984 मध्ये ते सर्टिफाई सर्जन झाले. त्यानंतर त्यांना अनेक संस्थांची फेलोशिप मिळाली. पेट्रिक यांचे लग्न अमेरिकन अभिनेत्री मिशेल बी चेन यांच्याबरोबर झाले असून, त्यांना मुलगा ल्युक आणि मुलगी निका अशी दोन मुले आहेत.

सर्वाधिक पगार असलेले सीईओ
पेट्रिक यांना खेळांची देखील आवड आहे. 2010 पासून त्यांच्याकडे अमेरिकेची प्रोफेशनल बास्केटबॉल टीम ‘लॉस एंजिलिस लेकर्स’ची मालकी आहे. याशिवाय अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र ‘लॉस एंजिलिस टाईम्स’चे ते मालिक असून, 2015 पासून ते सर्वाधिक पगार असणारे सीईओ देखील आहेत. मागील वर्षीच त्यांनी आणखी एक वृत्तपत्र ‘द सेन डिएगो युनियन ट्रिब्यून’ला 3457 करोडमध्ये विकत घेतले आहे. 2016 मध्ये फोर्ब्सने पेट्रिक यांना अमेरिकन श्रीमंताच्या यादीत 47 वे स्थान दिले होते. त्यावेळी अमेरिकेतील 92 तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील 138 धनाढ्य रूग्ण त्यांचे क्लाईंट होते.

वैद्यकीय क्षेत्रात सर्वोच्च स्थान
1991 मध्ये पेट्रिक यांनी युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सोडत डायबेटिज आणि कॅन्सरसाठी काम करणारी संस्था ‘विवोआरएक्स’ची स्थापना केली. 2007 मध्ये त्यांनी ‘नेंटहेल्थ’ची स्थापना केली. या संस्थेच्या मदतीने पेट्रीक यांनी 2012 मध्ये सुपर कॉम्प्युटरवर आधारित अशी प्रणाली सुरू केली, जिच्या मदतीने केवळ 18 सेंकदामध्ये रूग्णाच्या ट्यूमरचा शोध घेऊन उपचार केला जातो. हा कॅन्सरवरील उपचारासाठी वैद्यकीय क्षैत्रातील मोठा शोध आहे.

1036 करोडची रिअल इस्टेट संपत्ती
पेट्रिक हे फक्त वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात श्रीमंत डॉक्टर नसून, रिअल इस्टेट क्षेत्रात देखील त्यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांनी 2010 मध्ये लॉस एंजिलिस येथे 200 करोड रुपयांमध्ये एक कंपाऊंड खरेदी केले होते. मागीलवर्षी त्यांनी 345 करोडमध्ये पाच एकर जमीन विकत घेतली होती. याशिवाय त्यांनी 25 हजार एकरमध्ये 5 बेडरूम आणि 10 बाथरूम असणारे घर बनले आहे. या घरात जगातील सर्व हायटेक सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Comment