शिल्पा शेट्टी म्हणते; माझा पती निर्दोष, त्याच्या नावाचा पार्टनरने गैरवापर केला


मुंबई – मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलच्या टीमने शुक्रवारी राज कुंद्राच्या अश्लील अ‍ॅपसंदर्भात त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली. शुक्रवारी सायंकाळपासून सुरु झालेली चौकशी तब्बल सहा तास सुरु होती. दरम्यान, आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांकडे ईडीने कुंद्रा विरोधात दाखल असलेल्या एफआयआरची कॉपी आणि तपासाशी संबंधित इतर काही कागदपत्रांची मागणी केली आहे.

शिल्पाच्या घरी झालेल्या चौकशीतून नवीन खुलासे झाले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पाने चौकशीदरम्यान सांगितले की, वियान कंपनी मागील वर्षीच तिने सोडली होती. पोलिसांना दिलेल्या जबाबात शिल्पाने पुढे सांगितले की, ‘हॉटशॉट’ अ‍ॅप काय आहे आणि ते कसे कार्य करते याबद्दल आपल्याला माहिती नाही. तिला फक्त एवढेच माहिती होते की, तिच्या पतीची कंपनी वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म बनवते.

पोलिसांना शिल्पाने सांगितले की, इरॉटिक हे पॉर्नपेक्षा वेगळे आहे आणि तिचा नवरा निर्दोष आहे. राज कुंद्राचा बिझनेस पार्टनर आणि मेहुणा प्रदीप बक्षी याने त्याच्या नावाचा गैरवापर केला आहे. खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या प्रश्नावर शिल्पाने तिला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले आहे.

शिल्पाने सांगितले की, मी स्वत: एक अभिनेत्री आहे आणि मी कधीही कोणत्याही मुलीला न्यूड सीन करण्यास भाग पाडू शकत नाही आणि मी कोणालाही तसे करण्यास परवानगी देणार नाही. जर कोणावर दबाव आला असेल तर त्याने त्याच वेळी पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती.

त्या मुलींना जर कामात अडचणी येत होत्या, तर त्यांनी पैसे का घेतले, असा प्रश्न शिल्पाने पोलिसांसमोर उपस्थित केला. तिच्या मते, आम्हाला कोणत्याही कारणाशिवाय जाणूनबुजून या प्रकरणात अडकवले जात आहे. त्याचबरोबर पैसे उकळण्यासाठी तिच्या नव-याला या प्रकरणात अडकवले गेल्याचे शिल्पाचे म्हणणे आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी शुक्रवारी झालेल्या छापेमारी राज कुंद्राच्या घरातून काही हार्ड डिस्क, शिल्पाचा लॅपटॉप, आयपॅड आणि काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस तपासाअंतर्गत शिल्पाच्या फोनची क्लोनिंग करणार आहे. त्याचबरोबर यावर्षी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी राज कुंद्राने त्याचा फोन, लॅपटॉपवरून बराच डेटा डिलीट केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, आफ्रिका आणि लंडनमधून मोठी रक्कम शिल्पाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागापासून लपविण्यात आली होती. क्रिकेटच्या सट्टेबाजीशी कुंद्रा संबंधित असल्याचा पुरावा मिळाला आहे. शिल्पाच्या खात्यात यासंदर्भातील काही पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. सूत्रांनुसार, क्रिकेट बेटिंगदरम्यान अनेकदा शिल्पाच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या मते, शिल्पाला तिच्या नव-याच्या सर्व व्यवसायाविषयी आणि इतर संबंधित गोष्टींची पूर्ण माहिती होती, पण आता ती त्याला वाचवण्यासाठी या गोष्टी स्वीकारत नाही.