पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर


सातारा : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण 189 कुटुंबातील 755 जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.

कराड तालुक्यातील तांबवे गावातील 50 कुटुंबातील 207 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, कराड येथील 42 कुटुंबातील 163 व्यक्तींना नगरपालिका शाळा क्र. 2,3,4,11 येथे, नांदगाव येथील 12 कुटुंबातील 49 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, काले येथील 15 कुटुंबातील 58 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, टाळगाव येथील 30 कुटुंबातील 118 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, पोतले येथील 12 कुटुंबातील 52 व्यक्तींना आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले व जानुबाई मंदिर पोतले येथे, येणके येथील 3 कुटुंबातील 13 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, आणे येथील 8 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील जांभळी येथील 3 कुटुंबातील 14 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे, धावली, भेकवली, येरणे येथील 9 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, पाटण तालुक्यातील पाटण शहरातील 5 कुटुंबातील 21 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.

मदत कार्यातून मिरगाव येथील 150 व्यक्ती, आंबेघर येथील 50 व्यक्ती, ढोकवळे येथील 50 व्यक्ती, सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. वाझे येथील 50 व्यक्तींना बोटींनी हलविण्याचे काम सुरु असून एक टीम एनडीआरएफ ची मदतीसाठी मिरगाव येथे पोहचली आहे. 2 टीम भुवनेश्वर वरून मागविल्या असून त्या आता पुण्यातून कराडकडे रवाना झाल्या आहेत. नांदगाव ता. कराड 50, पाली 15 सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.