राज कुंद्रा १.२ मिलियन डॉलरला विकणार होता १२१ पॉर्न व्हिडिओ; पोलीस तपासात समोर आले सत्य


मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये उद्योजक राज कुंद्राचा पाय आणखीनच खोलात चालला आहे. या प्रकरणात आता एकामागोमाग एक नवे खुलासे होताना दिसत आहेत. अशात आता राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आगमी काळात राज कुंद्रा एक मोठी डील करणार होता. राज कुंद्रा १.२ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ८.९३ कोटी रुपयांना १२१ पॉर्न व्हिडिओ विकणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहाराची सर्व तयार झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा खुलासा शुक्रवारी झालेल्या सुनावणीत केला. एवढंच नाही तर पॉर्न फिल्ममधून होत असलेल्या कमाईचा वापर राज कुंद्रा ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये करत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. दरम्यान राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २७ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी न्यायालयात सुनावणीच्या वेळी सांगितले, राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅट्सटी तपासणी करत असताना, तो १२१ व्हिडिओंचा मोठा व्यवहार करणार होता, अशी माहिती समोर आली आहे. या व्यवहारात १.२ मिलियन डॉलरची रक्कम ठरवण्यात आली होती. हा व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारासाठी होत होती, असा अंदाज आहे. १९ जुलैला झालेल्या अटकेनंतर राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्पे यांना २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पण पोलिसांच्या तपासासाठी आता ही कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

न्यायालयीन सुनावणीत पोलिसांनी राज कुंद्रा पॉर्न फिल्म्समधून होणारी कमाई ऑनलाइन सट्टेबाजीसाठी वापरत होता, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान राज कुंद्रा, रायन थॉर्पे, आनंद बख्शी आणि इतर सहकारी ‘हॉटशॉट्स’ अॅपसंदर्भातील सर्व संभाषण व्हॉट्सअॅप ग्रुपवरच करत असत असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पण या प्रकरणी अटक होऊ शकते याची कल्पना आल्यानंतर रायन थॉर्पे याच्या सांगण्यावरून सर्व डेटा डिलिट केला गेला.