मुख्यमंत्र्यांचा शब्द पूर्ण करणार जितेंद्र आव्हाड; जाहीर केला नव्या तळीये गावाचा आराखडा


मुंबई : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या तळीये या गावातील 35 घरांवर दरड कोसळल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे होत्याचे नव्हते झाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: गावात पोहोचले आहे. तर दुसरीकडे, तळीये गाव उभारण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत तळीये गावाचे पुर्नवसन म्हाडा करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच तळीये गावातील नवे घर कसे असणार याचा आराखडा सुद्धा आव्हाड यांनी सादर केला आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.