आयसीएसई दहावी, आयएससी बारावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राचा १०० टक्के निकाल !


नवी दिल्ली – इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ISCE) अर्थात आयसीएसई इयत्ता दहावी आणि आयएससी बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९८ तर बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.७६ आहे. यंदा कोरोनामुळे या दोन्ही परीक्षा रद्द झाल्या होत्या. विशिष्ट सूत्र आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत.

देशभरातून तसेच परदेशातून आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण २,१९,४९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, तर बारावीच्या परीक्षेसाठी ९४,०११ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. दहावीत ९९.९८ टक्के तर बारावीत ९९.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील आयसीएसई बोर्डाचे दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल १०० टक्के तर बारावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. राज्यात एकूण २४,३५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २४,३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी परीक्षेसाठी ३,४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३,४२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, अपवादात्मक परिस्थितीत निकाल तयार करण्यात आल्यामुळे मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. इयत्ता दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांचे इयत्ता नववी आणि दहावीचे विविध परीक्षांमधील गुणांची सरासरी, तसेच दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण (प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल परीक्षा) यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला.

बारावीचा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांचे अकरावी आणि बारावीतील विविध परीक्षांमधील गुणांची सरासरी, इयत्ता दहावीतील इंग्रजी आणि बेस्ट चार विषयातील गुणांची सरासरी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण (प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल परीक्षा) यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला.