मोदी सरकारला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा सावधानतेचा इशारा


नवी दिल्ली : देशवासियांना आणि मोदी सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १९९१ साली देशाच्या अर्थव्यवस्थेची जी बिकट अवस्था होती, तशीच स्थिती काहीशी आगामी काळात निर्माण होऊ शकते. यासाठी सरकारने तयार राहावे, अस मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे.

आनंदी किंवा आत्ममग्न होण्याची ही काही वेळ नाही, तर ही आत्ममंथन आणि विचार करण्याची वेळ आहे. १९९१ च्या संकटाच्या तुलनेत पुढची वाटचाल अधिक आव्हानात्मक आहे. प्रत्येक भारतीयाला निरोगी आणि सन्मानपूर्वक आयुष्य निश्चित व्हावे, यासाठी एक राष्ट्र म्हणून आपली प्राथमिकता पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज असल्याचेही डॉ. सिंह यांनी यावेळी म्हटले.

कोरोना संक्रमणामुळे झालेले आरोग्य आणि नोकऱ्यांच्या नुकसानीमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. सामाजिक क्षेत्रात आरोग्य आणि शिक्षण विभाग मागे पडले. हे विभाग आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीसोबत चालू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव आणि नोकऱ्या गेल्या, हे टाळायला हवे होते, अशी खंतही माजी पंतप्रधानांनी व्यक्त केली.

२००४ ते २०१४ या काळात डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी मोठ्या खुबीने निभावली. त्यांना १९९१ साली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये पहिल्यांदा अर्थमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. आजपासून ३० वर्षांपूर्वी अर्थातच २४ जुलै १९९१ साली डॉ. मनमोहन सिंह यांनी आपला पहिला-वहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. हा अर्थसंकल्प देशातील आर्थिक उदारीकरणाचा पाया समजला जातो. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात डॉ. सिंह यांनी आपले विचार मांडले.