राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचकडून शिल्पा शेट्टीची चौकशी; केला प्रश्नांचा भडीमार


मुंबई : अश्लील चित्रपट बनवून ते काही अॅपवर पब्लिश केल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आज चौकशी करण्यात आली. न्यायालयाने राज कुंद्राला शुक्रवारी पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलीस राज कुंद्राला त्याच्या राहत्या घरी घेऊन गेले. तिथे अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थित होती. यावेळी शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रश्नांची उत्तरे शिल्पाने नाही अशीच दिली. या चौकशी दरम्यान, क्राईन ब्रांचने शिल्पाला विचारलेल्या प्रश्नांची यादी समोर आली आहे.

शिल्पा शेट्टीला क्राईम ब्रांचने विचारलेले प्रश्न :

  • तुम्ही वियान कंपनीमधून 2020 मध्ये बाहेर का पडलात? तुमचे तर चांगले शेअर्स होते?
  • वियान आणि कॅमरिन या दोन्ही कंपन्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का?
  • वियान कंपनीच्या कार्यालयाचा पॉर्न व्हिडीओ लंडनमध्ये पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी अनेकदा वापर करण्यात आला आहे, याची तुम्हाला माहिती होती का?
  • हॉटशॉटबाबत तुम्हाला माहीत होते, ते कोण चालवायचे ?
  • तुम्हाला हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेंटबाबत काय माहिती आहे?
  • हॉटशॉटच्या कामात तुम्ही कधी सहभागी झाला आहात का?
  • कधी हॉटशॉटबाबत प्रदीप बक्शी (राज कुंद्राचा मेव्हणा) यांच्याशी बोलणे झाले होते का?
  • राज कुंद्रा करत असलेल्या सर्व कामांबाबत तुम्हाला माहिती होती का?
  • तुम्हाला राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहारांबाबत काय माहिती आहे?

दरम्यान, शिल्पा आणि राजच्या घराची झडतीही घेण्यात आली. क्राईम ब्रांचने यावेळी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. त्यानंतर प्रॉपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला 20 ते 25 प्रश्न विचारले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचला चौकशी दरम्यान, माहिती मिळाली होती की, शिल्पा शेट्टीला हॉटशॉटबाबत माहिती होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा प्रमाणेच शिल्पानेही पोलिसांना सांगितले की, या व्हिडीओंशी तिचाही काहीही संबंध नाही, ज्या व्हिडीओंना क्राईम ब्रांच पॉर्नोग्राफिक म्हणत आहे. राज कुंद्राने सांगितले की, सर्व गोष्टी त्याचा मेव्हणा प्रदीप बक्शी लंडनहून चालवत होता. तो केवळ व्हॉट्सअॅपवर बोलायचा. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे आहेत. ज्यावरुन यासर्व प्रकरणाचा सुत्रधार राज कुंद्राच आहे, हे स्पष्ट होईल. अशातच मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अशी कोणतीच माहिती मिळाली नाही, ज्यावरुन शिल्पा शेट्टीचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट होईल.