मुख्यमंत्र्यांचे तळीये ग्रामस्थांना आश्वासन; दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करणार, सर्वांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल


मुंबई – सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून नुकतीच त्यांनी भर पावसात महाडजवळील तळीये गावाची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळीये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिले. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.


आज दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तळीये गावात दाखल झाले होते. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, या सर्वांनी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पावसाळ्यात अशा घटना नेहमी घडतच असल्याचे अनुभव येत आहे. त्यामुळे आदी त्या भागांचा आराखडा तयार करण्यात येईल. जेणेकरुन ऐन पावसाळ्यात या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल, असे ते म्हणाले. तसेच दुर्घटनेतील प्रत्येक कुटुबांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या, इतर सर्व आमच्यावर सोडा असे मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना धीर देताना सांगितले. कागदपत्राची कोणतीच काळजी करु नका, सर्वाना योग्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये ग्रामस्थांना यावेळी दिले.