सर्वाधिक प्री बुकिंगचे ओला ई स्कुटरने केले रेकॉर्ड

ओला त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणण्याच्या तयारीत असून या स्कुटरसाठी कंपनीने प्रीबुकिंग गेल्या आठवड्यात सुरु केले आहे. ग्राहकांनी या स्कुटर मध्ये प्रचंड इंटरेस्ट दाखविला असून २४ तासात १ लाखाहून अधिक स्कूटर्ससाठी प्री बुकिंग झाले असल्याचे समजते. यामुळे ओलाने जगात सर्वाधिक प्री बुकिंग मिळालेली स्कुटर असे रेकॉर्ड लाँच होण्यापूर्वीच नोंदवले आहे.

ही स्कुटर सिंगल चार्ज मध्ये १५० किमी धावेल आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी १०० किमी. या स्कुटरला नॉन रीमुव्हेबल लिथियम आयन बॅटरी दिली गेली असून केवळ १८ मिनिटात ती ५० टक्के चार्ज होते. कंपनीने दहा आकर्षक रंगात ही स्कुटर येत असल्याचे जाहीर केले आहे. लाल, निळापिवळा, गुलाबी, ग्लॉसी, सिल्व्हर, काळा, ग्रे आणि निळा अशी ऑप्शन ग्राहकाला मिळणार आहेत. या स्कुटरची अंडर सीट स्पेस अन्य दुचाकींच्या तुलनेत अधिक आहे.

तामिळनाडू मधील प्रकल्पात या स्कुटरचे उत्पादन होत असून या प्रकल्पाची क्षमता वर्षाला १ कोटी स्कुटर निर्मितीची आहे. सुरवातीला वर्षाला २० लाख स्कूटर्स बनविल्या जाणार आहेत. दर दोन सेकंदाला एक स्कुटर तयार होईल असे समजते. दररोज २५ हजार बॅटरी बनविण्याची या प्रकल्पात सुविधा आणि क्षमता आहे असे कंपनीने जाहीर केले आहे.