हे आहे जगातील सर्वात मौल्यवान लाकूड
मौल्यवान म्हणता येतील अश्या असंख्य गोष्टी जगात पाहायला मिळतात. लाकूड ही त्यामानाने फारसे महत्व नसलेली वस्तू असली तरी जगातील महाग लाकूड कुठले असे विचारले तर आपल्या तोंडात चटकन चंदन हेच नाव येते. भारतात चंदनाचा भाव किलोला ६ ते ८ हजार रुपये दरम्यान आहे. मात्र चंदन हे जगातील सर्वात महाग लाकूड नाही. सर्वात महाग लाकडाचा मान जातो आफ्रिकी ब्लॅकवूड कडे. पृथ्वीवरचे हे सर्वात दुर्लभ आणि मौल्यवान लाकूड मानले जाते.
दक्षिण व मध्य आफ्रिकेतील २६ देशात हे लाकूड मिळते आणि त्याचा भाव आहे किलोला ८ हजार पौंड म्हणजे ७ लाख रुपये. हे लाकूड दुर्लभ आहे, मागणी जास्त आहे आणि म्हणून ते अधिक महाग आहे. एका झाडाची पूर्ण वाढ होण्यास ६० वर्षे लागतात आणि हे झाड २५ ते ४० फुट उंच वाढते. विशेष म्हणजे ते दुष्काळी किंवा कोरड्या भागात आढळते.
या झाडाच्या लाकडाचा वापर सनई, बासरी, गिटार अशी वाद्ये बनविण्यात होतो. त्याच्या पासून मजबूत आणि टिकाऊ फर्निचर बनते पण ते इतके महाग असते की जगातील अतिश्रीमंतच ते विकत घेऊ शकतात. या झाडाला खूप शत्रू आहेत. विशेषतः लाकडाला मिळणाऱ्या किमतीमुळे तस्कर, झाड पूर्ण वाढण्याअगोदरच त्याची तोड करतात. यामुळे ही झाडे संखेने कमी होत चालली आहेत. केनया, टांझानिया देशात याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. यामुळे तेथील सरकारांनी या झाडांच्या संरक्षणासाठी जंगलात सशस्त्र जवान तैनात केले आहेत.