देशाचा खजिना भरला, परकीय चलन गंगाजळी ६१२.७३ अब्ज डॉलर्सवर

देशाचा खजिना पूर्ण भरला असल्याचे रिझर्व बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारी वरून दिसून आले आहे. देशाच्या परकीय चलन गंगाजळीत १६ जुलै २०२१ ला संपलेल्या आठवड्यात ८३.५ कोटी डॉलर्सची भर पडून ही गंगाजळी ६१२.७३ अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. ही रेकॉर्ड वाढ असल्याचे सांगितले जात आहे. रिझर्व्ह बँकेकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार ९ जुलै रोजी समाप्त झालेल्या गेल्या आठवड्यात  या गंगाजळीत १.८८३ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती ६११.८९५ अब्जवर गेली होती.

रिझर्व बँकेकडून परकीय चलन, सोने साठा संदर्भातील साप्ताहिक आकडेवारी जारी केली जाते. देशाचा सुवर्ण साठा ३७.७ कोटी डॉलर्सने वाढून ३७.३३३ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जवळ असलेल्या विशेष आहरण अधिकार ( स्पेशल ड्रॉइंग राईट) मध्ये १० लाख डॉलर्सने वाढ होऊन ते १.५४८ अब्ज डॉलर्सवर गेले असल्याचे सांगितले गेले आहे.