ऑलिम्पिक नगरी टोक्योची ही आहेत वैशिष्ठे

जपानची राजधानी टोक्यो मध्ये ऑलिम्पिक २०२० चा महाकुंभ भरला आहे. या शहरात हे दुसरे ऑलिम्पिक होत आहे. टोक्यो शहराबद्दलच्या काही खास गोष्टी या निमित्ताने आमच्या वाचकांसाठी सांगत आहोत.

जपान हा देश असंख्य छोट्या बेटांचा मिळून बनलेला आहे. पैकी होन्शु बेटावर टोक्यो नगरी वसलेली आहे. मुख्य शहर आणि त्याची उपनगरे असा याचा पसारा आहे. मुख्य शहराची लोकसंख्या ६६ लाख तर उपनगरे धरून लोकसंख्या ३.७ कोटी आहे. त्यामुळे टोक्यो हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. ८० किमी परिसरात या शहराचा विस्तार आहे. त्या मुळे हे सर्वात मोठे शहर सुद्धा आहे.

हे महानगर आहे पण त्यात २३ वॉर्ड आहेत आणि प्रत्येक वॉर्ड म्हणजे जणू एक शहर आहे. त्यांची स्वतःची सरकारे आहेत. ३९ नगरपालिका प्रशासन चालवितात. टोक्यो मधल्या ५१ कंपन्या फॉर्च्यून ग्लोबल यादीतील ५०० कंपन्यामध्ये असून फुजी टीव्ही, टोक्यो एमएक्स, टीव्ही टोक्यो, निप्पोन अश्या अनेक टीव्ही नेटवर्क कंपन्यांचे हे माहेरघर आहे. हे शहर २४ तास जागे असते आणि जगातील सुरक्षित शहरात नंबर एकचे शहर आहे. पूर्वी हे मासेमारी करणाऱ्यांचे छोटेसे गाव होते आणि त्याचे नाव होते इदो. १८६८ मध्ये ही देशाची राजधानी झाल्यावर त्याचे नाव टोक्यो झाले

या शहराचे एक नवल असे की प्रत्येक दुपारी या शहराची लोकसंख्या २५ लाखाने वाढते. बरेच नोकरदार, विद्यार्थी, आसपासच्या गावातून येथे कामानिमित्ताने येतात. आणखी एक विशेष म्हणजे या शहरात सर्वाधिक लोक चीनी आहेत. त्यानंतर कोरियाई, फिलिपिनो, अमेरिकन, ब्रिटीश, ब्राझिलियन आणि फ्रेंच लोकांची येथे वस्ती आहे. जगात जी तीन शहरे जागतिक अर्थव्यवस्थेचे संचालन करतात त्यात टोक्यो आहे. अन्य दोन शहरे आहेत लंडन आणि न्युयॉर्क. टोक्यो मध्ये जगातील बड्या गुंतवणूकदार बँका, विमा कंपन्यांची मुख्यालये असून दोन विमानतळ आहेत.

टोक्यो जपानचे प्रवेशद्वार मानले जाते. या शहरात ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, ट्राम, नावा अश्या अनेक वाहतूक सुविधा आहेत. तसेच येथे अनेक विश्वविद्यालये आणि कॉलेजेस आहेत. राजाचा शाही महाल येथे असून राजाच्या जन्मदिवशी सर्वसामान्य जनता हा महाल दुरून पाहू शकते. टोक्यो मध्ये मंदिरे, म्युझियम, आर्ट गॅलरीज अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. आधुनिकता आणि परंपरा यांचा बेजोड संगम या शहरात पाहायला मिळतो. टोक्यो टॉवर ३३३ मीटर उंचीचा असून आयफेल टॉवर पेक्षा तो १३ मीटर अधिक उंच आहे.