उमंग अॅप झाले अधिक उपयुक्त

भारत सरकारचे उमंग अॅप आता युजर्स साठी अधिक उपयुक्त माहिती देणारे अॅप बनले आहे. युजर्स यापुढे या अॅपवरून जवळची रक्तपेढी, पेट्रोल पंप, स्थानिक बाजार याची माहिती मिळवू शकतील त्याचबरोबर मॅप माय इंडियाचे इंटीग्रेशन केले गेल्याने याच्या मदतीने अनेक अॅलर्ट सुद्धा युजर्स ना मिळणार आहेत तसेच अनेक नवी फिचर्स सुद्धा मिळणार आहेत.

माहिती प्रसारण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या सिंगल प्लॅटफॉर्म अॅपवर युजर्सना जवळच्या ठिकाणांची सविस्तर माहिती मिळेल आणि व्हिलेज लेव्हल नकाशे सुद्धा मिळतील. जवळपासचे छोटे बाजार, रक्तपेढ्या, जनसेवेशी संबंधित महत्वाची ठिकाणे कळतील तसेच आधार, डिजी लॉकर, पे गाव सारख्या सेवाही अॅक्सेस करता येतील.

मॅप माय इंडिया फिचर मुळे वाहतूक नेव्हिगेशन, रस्ते सुरक्षा अॅलर्ट, तुम्हाला जेथे जायचे आहे त्या ठिकाणाचे अंतर, दिशा या संदर्भातल्या सूचना वेळोवेळी व्हॉइस कॉल मधून मिळणार आहेत. रास्त दराची दुकाने, तेथे जायचा मार्ग, ‘बाजार नियर मी’ सेवेनुसार जवळचे मार्केट अशी माहिती मिळणार आहे. पाउस काळात आसपासच्या भागात कुठे वीज पडण्याची शक्यता आहे याची माहिती, जेथे काही वेळापूर्वी वीज पडली त्या ठिकाणाची माहिती सुद्धा मिळणार आहे.

मोदी सरकारने हे अॅप २०१७ मध्ये सुरु केले असून भारत सरकारचे एकल एकीकृत, सुरक्षित, मल्टी चॅनल, मल्टीप्लॅटफॉर्म, मल्टी सर्विस मोबाईल अॅप आहे. अनेक भारतीय भाषांत ते उपलब्ध आहे.