झोमॅटोच्या बहुचर्चित शेअरचे झोकात पदार्पण; ५१ टक्क्यांची पदार्पणातच वाढ


मुंबई – शुक्रवारी अत्यंत झोकात झोमॅटोच्या बहुचर्चित शेअरने बाजारात पदार्पण केले. शेअर बाजारात ज्यावेळी झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली, त्यावेळी एका शेअरचा भाव ११५ रुपये एवढा झाला. हा भाव मूळ आयपीओच्या वेळी ७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता, त्यात तब्बल ५१ टक्क्यांची वाढ शुक्रवारी पदार्पण होताच झाली.

तर, गुंतवणूकदारांनी काही वेळातच या शेअरच्या खरेदीसाठी झुंबड केली आणि शेअरचा भाव मूळ किमतीच्या तब्बल ८२ टक्क्यांनी वधारत प्रति शेअर १३९ रुपयांपर्यंत पोहचला. बाजारातील भांडवली मूल्याचा विचार केला तर झोमॅटोने एक लाख कोटी रुपयांचा पल्ला पदार्पणाच्या दिवशीच पहिल्या काही तासांतच गाठला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये या शेअरची खरेदी केली, त्यांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट झाली आहे.

केवळ शेअर्सच्या संख्यात्मक उलाढालीचा विचार केला तर मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी काही तासांमध्ये ४२ लाख शेअर्सची व राष्ट्रीय शेअर बाजारात १९.४१ कोटी शेअर्सची खरेदी विक्री झाली आहे. झोमॅटोचा ९,३७५ कोटी रुपयांचा आयपीओ १४ ते १६ जुलैदरम्यान विक्रीसाठी आला होता. फूडटेक या प्रकारात मोडणाऱ्या या कंपनीच्या समभागासाठी उपलब्ध केलेल्या शेअर्सच्या तुलनेत ३८ पट जास्त मागणी नोंदवण्यात आली, तेव्हाच हा आयपीओ म्हणजे मेगा सक्सेस असेल हे दिसून आले होते. मार्च २०२० मध्ये आलेल्या एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसच्या १०,३४१ कोटी रुपयांच्या आयपीओनंतरचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे.