गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू, तर सातजण जखमी


मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबईत थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी जमा झाले होते. दरम्यान, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

शुक्रवारी पहाटे ४.५८ वाजता गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी ७ जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता, तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, महाराष्ट्रात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.