मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.
रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – अनिल परब
परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले,मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून देवून पहाटे ४ वाजल्यापासून बस सेवा सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५ हजार ८०० हून अधिक प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले.
पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बस सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती परब यांनी दिली.